धरणगावात घरफोडी
धरणगाव (प्रतिनिधी):- शहरात घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, संजय नगर भागातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ९८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबवल्याची घटना घडली आहे. यात रोख रकमेसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.


संजय नगर भागातील रहिवासी आणि किराणा दुकानदार लक्ष्मण हिरामण चौधरी (वय ३६) हे आपल्या कुटुंबासह राहतात. दि. २३ मार्च रोजी मध्यरात्री १२:३० ते सकाळी ९ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटाची आणि सामानाची उचकापाचक करून मौल्यवान मुद्देमाल चोरून नेला.
एकूण मुद्देमाल १,९८,००० रुपये चोरीला गेले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. धरणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नसून, पोलिस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.








