धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे घटना
धरणगाव (प्रतिनिधी):- तालुक्यातील पाळधी येथील भजे गल्ली भागात अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ५१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी निलेश प्रभाकर पाटील (वय ३३, रा. भजे गल्ली, पाळधी ता. धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. दि. ११ मार्च च्या रात्री १ वाजेपासून ते दि. १२ मार्चच्या सकाळी ६ वाजेच्या सुमारास, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खालच्या खोलीला कोणी नसल्याचा फायदा घेतला. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि हॉलमध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचे लॉकर तोडले.
कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. एकूण ५१,३०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या घटनेबाबत निलेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकाँ. संदीप मधुकर खंडारे हे करीत आहेत.









