जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : गटारी व गावहाळ बांधण्याचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पडले आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
नितीन भीमराव ब्राम्हणे (वय ३७, रा. खर्दे बुद्रुक, ता धरणगाव) असे अटकेतील लाचखोर ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या गावात गटारीचे २ लाखाचे व गावहाळ बांधण्याचे ७० हजार रुपयाचे अशी २ लाख ७०हजार रुपयाचे काम केले होते. आलोसे ग्रामसेवक नितीन ब्राह्मणे यांनी तक्रारदार यांच्या दोन्ही कामाचे बिल काढुन देऊन, सदर कामाचे १ लाख ९५ हजार व ६९ हजार असे २ स्वतंत्र चेक दिले होते व सदर बिलाची एकूण रक्कम २,६४,000 रुपये तक्रारदार यांच्या खात्यात जमा झाली होती.
तक्रारदार यांच्या कामाची बिले व सदर बिलांचे २ चेक काढून दिले या कामाचा मोबदला म्हणून संशयित आरोपी ग्रामसेवक ब्राह्मणे यांनी तक्रादार यांच्याकडे १० टक्क्याप्रमाणे २५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार केली. त्यानुसार आज दि. २२ रोजी जळगाव एसीबीच्या पथकाने कारवाई सापळा रचत लाचखोर ग्राम विकास अधिकाऱ्याला २५ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. सदरची कारवाई पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांचे मार्गदर्शनखाली पोउनि सुरेश पाटील, किशोर महाजन, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.