रावेर शहरातील घटना,
चौकशीनंतर झाली कारवाई
रावेर (प्रतिनिधी) – शहरात अवैध धान्यसाठा केला म्हणून दोन व्यापाऱ्यांवर रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केलेल्या तपासणीत शहरातील बर्हाणपूर रोड वरील दोन खाजगी गोदामात धान्याचा अवैधसाठा आढळुन आला होता. हे गोदाम सिल करण्यात आले होते. या प्रकरणी अहवाल व चौकशी करण्यात आल्यानंतर आज दि. १० जून रोजी पुरवठा अधिकारी डी. के. पाटील यांनी रावेर पोलिस स्थानकात येऊन फिर्याद दिली आहे.
गणेश देवराम चौधरी यांच्या चौधरी ट्रेडर्स नावाच्या गोदामात एकूण ७ लाख ७७ हजार २०० रुपयांचा धान्यसाठा आढळुन आला. यामध्ये ९७ गहू कट्टे, २०८ तांदुळाचे कट्टे, ११ ज्वारी कट्टे, १८० मका कट्टे आणि १७,२५० बारदान आढळले. तर दुसरा व्यापारी मो. रिहान शेख मोईन (रा नागझिरी मोहल्ला) यांच्या गोदामामध्ये २७,४५० रुपये किमतीचा माल यात ८ गहु कट्टे, १७ तांदळाचे कट्टे असा एकूण दोघे गोदामामध्ये ८ लाख ०४ हजार ६५० रुपये किमतीच्या धान्याचा अवैध साठा मिळून आला.
या अनुषंगाने रावेर पोलिस स्टेशनला दोन्ही व्यापाऱ्यांविरुद्ध पुरवठा अधिकारी डी. के. पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर करीत आहेत.