तपासामध्ये पारोळा पोलीस स्टेशनला यश
पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील धरणगाव माथा व धान्य मार्केटमधून तब्बल ६० हजार रुपयांच्या बॅटरी चोरीचा गुन्हा स्थानिक पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला आहे. अज्ञात चोरट्याने दि. २८ जुलै रोजी रात्री चोरी केलेल्या बॅटऱ्या आणि वापरलेले वाहन जप्त करत आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही दिवसांपासून धरणगाव माथा परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. २८ जुलै रोजी रात्री ८ नंतर अज्ञात चोरट्याने धान्य मार्केट परिसरातून एकूण चार बॅटऱ्या चोरल्याची फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली होती. पारोळा पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी विशेष तपास पथक स्थापन केले. या पथकात पोह. डॉ. शरद पाटील, पोह. महेश पाटील, पोह. अरुण बागुल, पोकाँ. सुनील हटकर, पोकाँ. अनिल राठोड, पोकाँ. मिथुन पाटील, पोकाँ. गोविंदा पाटील आणि चापोह. मधुकर पाटील यांचा समावेश होता.
तपासदरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी चंद्रकांत गौरख चौधरी (रा. कॅप्टन नगर, पारोळा) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरलेल्या बॅटऱ्या म्हसवे फाट्याजवळ एका वाहनात लपविल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन चारही बॅटऱ्या आणि चोरीत वापरलेले वाहन जप्त केले. सदर संशयित आरोपीला पारोळा न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोह. डॉ. शरद पाटील हे करत आहेत.