जळगांव जामोद ;- धानोरा महासिध्द येथील लघु प्रकल्पात हत्ती पाऊल धरणात मामा व दोन भाच्यांचा धरणात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज १८ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे, तीर्थक्षेत्र धानोरा महासिध्द गावात शोककळा पसरून हळहळ व्यक्त होत आहे .
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १७ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पुणे येथे कामाला असणारा विनायक गाडगे (वय२७) सध्या लॉकडाऊनमुळे धानोरा येथे घरी आला होता. त्याच्या सोबत काकाचा मुलगा तेजस गाडगे (वय १८) आणि मामा नामदेव वानखडे (वय ४३) हे मलकापूर तालुक्यातील दाताळा येथून आपल्या बहिणीला लग्न समारंभासाठी न्यायला धानोरा येथे आले होते. मामा आणि भाचे हे तिघे जण धानोरा लघु प्रकल्प परिसरात फिरायला गेले होते. उन्हाळा असल्याने ते तेथे पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते.
हे तिघे रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातलगांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. यानंतर, गावच्या पोलीस पाटलांनी घटनेची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला दिली. धरण परिसरात शोध सुरू असताना त्यांचे कपडे आणि मोबाईल फोन पाण्याच्या काठावर आढळून आले. रात्र झाल्याने अंधारात मृतकांचा शोध लागला नाही. आज सकाळी पुन्हा शोध घेतला असता पाण्यामध्ये मृतदेह तरंगताना निदर्शनास आले. यानंतर पोहणाऱ्या लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले गेले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.