मुक्ताईनगर तालुक्यातील घटना, कारण अस्पष्ट
जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळे गावचे सरपंच पांडुरंग गणेश तांबे (वय ४९) यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये विषारी औषध घेऊन मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर तालुक्यामध्ये खळबळ उडाली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
पांडुरंग गणेश तांबे (वय४९, रा.थेरोळे ता. मुक्ताईनगर) हे गावामध्ये आई, पत्नी, दोन मुले यांच्यासह राहत होते. शेती काम करून पांडुरंग तांबे हे परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यामध्ये होते, अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली. दरम्यान मंगळवारी दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान त्यांच्या शेतामध्ये पांडुरंग तांबे यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
त्यांना ग्रामस्थांनी सुरुवातीला मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालय आणि त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे व सर्वांना मदत करणारे अशी प्रतिमा त्यांची थेरोळे गावात होती. एमआयडीसी पोलीस स्टेशनला मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.