धुळे जिल्ह्यातील साक्रीतील घटना उघड
धुळे (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शहरात पडलेल्या सशस्त्र दरोडा आणि अपहरणप्रकरणी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. दरोडा व अपहरणाचा कट हा अपहृत झालेल्या तरुणीनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने रचल्याचे व घडवून आणल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर आणखी ४ संशयितदेखील ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
येथील दहिवेल रस्त्यालगत सरस्वतीनगरात शनिवारी दि. २४ ज्योत्स्ना नीलेश पाटील यांच्या घरी रात्री साडे दहाच्या सुमारास काही दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. ज्योत्स्ना पाटील यांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील सुमारे ८८ हजार ५०० किमतीचे दागिने हिसकावले. तसेच त्यांच्या २३ वर्षीय भाचीला घेऊन पाच ते सहा दरोडेखोर पसार झाले होते. दरोड्यासोबतच तरुणीच्या अपहरणामुळे या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिस शोधपथकाने घटनेच्या चौथ्या दिवशी दोन संशयितांना इंदूर (मध्य प्रदेश)जवळील एका गावातून ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यातील इको कार व बोलेरो अशी दोन वाहनेदेखील ताब्यात घेतली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी जलद तपास करत चोवीस तासांत अपहृत तरुणीला सेंधवा (मध्य प्रदेश) येथून सुखरूप ताब्यात घेतले आणि साक्रीत परत आणले. मात्र, या प्रकरणातील संशयित पोलिसांच्या हाती लागत नव्हते. या प्रकरणात अनेक प्रकारची संदिग्धता निर्माण होत असल्याने विविध शक्यतांचा विचार करून पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली होती.संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सात पथके सक्रिय करण्यात आली. शोध सुरू असताना साक्री पोलिसांच्या एका पथकाने गोपनीय माहितीवरून मंगळवारी दि. २८ रोजी इंदूरजवळ एका गावातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात यश आले.
अपहृत तरुणीने मात्र तपासात सहकार्य केले नसल्याचे दिसून आले. ती एका मेडिकल दुकानात कामाला आहे. तिच्या मोबाईलद्वारे पोलिसांना बऱ्याच गोष्टींचे धागेदोरे उलगडता आले आहेत. त्यावरून घटना उघड झाली आहे. विनोद भरत नाशिककर (वय ३८, गायत्रीनगर, शाजापूर, मध्यप्रदेश) व रोहित संजय गवळी (वय २२, मोगलाई, धुळे) या दोघांना अटक करण्यात आली. यातील रोहित गवळी हा वाहनचालक आहे. तर विनोद नाशिककर हा सौरऊर्जेचा ठेकेदार असून तो अपहृत तरुणीचा प्रियकर आहे. दोघांनी पळून जाण्याच्या इराद्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून हा कट रचल्याचे उघड झाले. अपहृत तरुणीच्या घराशेजारी संशयित विनोद नाशिककर हा पूर्वी राहत होता. तेव्हापासून या तरुणीशी त्याची ओळख होती.
शनिवारी दि. २५ रोजी दरोड्याच्या आधी विनोद व हरियाणातील ४ संशयित मजूर हे सेंधव्यात दुपारी एकत्र आले होते. त्यानंतर ते साक्रीत संध्याकाळी पोचले. संबंधित तरुणी हि विनोदच्या संपर्कात होती. रात्री साडेदहा वाजता संशयित विनोद व इतर पाच जणांनी तरुणीच्या आत्याच्या घरी दरोडा टाकला. तेथे ८८ हजार ५०० रुपयांचे सोने लुटून तरुणीचे हात बांधून तिचे अपहरण करून घेऊन गेले. तरुणी व तिच्या आत्याचे फोन रस्त्यात फेकून दिले. तर विनोदने वापरलेली छऱ्याची छोटी बंदूक देवास जवळ क्षिप्रा नदीत टाकून दिली. दरोडा टाकल्यावर धुळे जिल्ह्यातील रायपूरवाडी येथे पोचल्यावर संशयितांपैकी रोहित गवळी व इतर ४ संशयित हे इको कार घेऊन दुसऱ्या दिशेला तर विनोद व तरुणी हे मध्यप्रेदशकडे शाजापूरला गेले.
पोलीस अधीक्षकांची एंट्री अन् संशयितांना भरली धडकी
याप्रकरणी नेमकी काय हालचाल सुरु आहे, हे विनोद स्वतः साक्रीत येऊन तपासत होता. विनोदने अपहरण केलेल्या तरुणीच्या वडिलांना भेटून माहिती घेतली होती. मात्र सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी साक्रीत येऊन तपासात वैयक्तिक लक्ष घातले. हे संशयित विनोद नाशिककर याला समजताच त्यांना धडकी भरली. त्यानंतर तरुणी शाजापूर येथून सेंधवा येथे गेली आणि तेथून तिने तिच्या वडिलांना फोन लावला होता. तेव्हा पोलिसांनी तिला धुळ्यात आणले होते. त्यानंतर पोलिसांचा तपास सुरु होता. पोलिसांच्या विविध पथकाने अथक परिश्रम घेऊन पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी तपास करून घटना उघड करीत संशयितांना ताब्यात घेत अटक केली आहे.