मतदानाच्या दिवशी जळगाव ग्रामीणऐवजी रावेरमध्ये हजेरी ?
जळगाव (प्रतिनिधी) : माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात जळगावऐवजी रावेर लोकसभा मतदार संघात अधिकचे लक्ष दिल्याची जोरदार चर्चा आहे. अगदी मतदानाच्या दिवशी देखील ते रावेरमध्ये दिवसभर हजर असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, देवकरांनी जळगावपेक्षा रावेर मतदार संघात अधिकचे लक्ष दिल्याच्या मुद्द्यावरून उलट-सुलट चर्चा सुरु असून याचे पडसाद आगामी विधानसभेच्या काळात जळगाव ग्रामीण मतदार संघात उमटणार असल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातील भूमिकेबाबत उलट सुलट चर्चा आहेत. कारण प्रचाराच्या काळात देवकर यांनी आपला विधानसभा मतदार संघ अर्थात जळगाव ग्रामीणमध्ये फारसे सक्रीय नव्हते. धरणगाव, नशिराबाद, शिरसोलीसह महत्वपूर्ण गावातील प्रचारात त्यांनी नाममात्र, हजेरी लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटही विधानसभेच्या वेळी अशाच पद्धतीने अंग चोरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशात जळगाव ग्रामीणमधून तब्बल ६२ हजारहून अधिकचा लीड असल्यामुळे देवकरांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काम केले किंवा नाही? याबाबतही उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
दरम्यान, काही जणांच्या मते तर मतदानाच्या दिवशी देवकर हे रावेर मतदार संघामध्ये फेरफटका मारत होते, अशी देखील चर्चा आहे. अर्थात याबाबत अधिकची स्पष्टता नसली तरी यातून महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर येत आहे. निकालानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांत शांतता पसरली आहे. त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार राष्ट्रवादी गटातील मतभेद आगामी विधानसभेच्या काळात समोर येऊ शकतात? असेही बोलले जात आहे. देवकर हे खरचं प्रचाराच्या काळात आणि मतदानाच्या दिवशी रावेर मतदार संघात होते का? असतील तर त्याचे कारण काय? आगामी विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटतील का? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं विधानसभा निवडणुकीच्या काळातच मिळतील, हे देखील तेवढेच खरे आहे.