जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात 87 वर्षीय वृद्धावर गॅंगरीनची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. पंधरा दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी नातेवाईकांनी डॉक्टरांच्या टीमचे आभार मानले.
वरसाळे (ता पाचोरा) येथील रहिवाशी प्रल्हाद तान्हू पाटील यांना महिनाभरापासून अंडकोशाजवळ त्रास होत होता.मुलांनी त्यांना पाचोरा येथील रुग्णालयात नेले. त्यांना अंडकोशाजवळ गॅंगरीन झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले व पुढील उपचारासाठी जळगाव येथे नेण्याचा सल्ला दिला. प्रल्हाद पाटील यांच्या मुलांनी त्यांना देवकर रुग्णालयात दाखल केले.
येथील डॉक्टरांनी त्यांच्या सर्व तपासण्या करून गॅंगरीनचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. जनरल सर्जन डॉ समीर चौधरी, आयसीयू तज्ञ डॉ प्रियंका पाटील, डॉ स्नेहल गिरी, भूलतज्ञ डॉ आशी अन्वर या डॉक्टरांच्या टीमने सर्व धोके लक्षात घेता शस्त्रक्रिया केली. पाटील यांच्या अंडकोशाला जवळील गॅंगरीन दूर करण्यात डॉक्टरांना यश आले. नंतर त्यांना रिकवरीरूम मध्ये ठेवून उपचार करण्यात आले. यशस्वी उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
प्रल्हाद पाटील यांचे पुत्र गुलाबसिंग पाटील यांनी सांगितले, की महिन्याभरापासून वडिलांना होणारा त्रास पाहिला जात नव्हता. त्यांना गॅंगरीन झाल्याचे स्पष्ट झाल्यावर कुटुंब चिंतेत होते. देवकर हॉस्पिटल आम्ही तातडीने गाठले. येथील डॉक्टरांनी अगदी कसब पणाला लावून आमच्या वडीलांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि त्रासापासून त्यांची मुक्तता केली, आम्ही रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या टीमचे मनापासून आभार व्यक्त करतो.