नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई (प्रतिनिधी) :- पूर्वी ट्वेन्टी ट्वेन्टी सामना होता. आता पूर्ण टेस्ट मॅच राहील. ५ वर्षे स्थिर सरकार राज्यात राहणार आहे. दिशा तीच, गती, समन्वयही तोच राहणार आहे. पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत अधिकाऱ्यांना गतिशील, विकासात्मक कामकाज करण्याबाबत सांगितले आहे. तसेच, लाडकी बहीण योजना सुरूच राहिल व बहिणींना २१०० रुपये मिळतील अशी माहिती नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर रात्री पत्रकार परिषदेत माहिती दिली. महाराष्ट्र विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर बोलताना फडणवीस म्हणाले की, पत्रकार हे लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आहे. पुढील काळात महाराष्ट्र वेगाने पुढे जाईल. प्रत्येक क्षेत्रात अग्रणी राहील. शेतकऱ्यांचे प्रकल्प, सामाजिक योजना, विद्यार्थ्यांसाठीचे निर्णय हे पुढे सुरूच राहणार आहे.
जाहीरनाम्यांतील आश्वासने पूर्ण करणार असून आश्वासनांसाठी लागणाऱ्या व्यवस्थादेखील आम्ही तयार करू असे सांगत फडणवीस यांनी, लोकाभिमुख सरकार चालवू. पारदर्शीपणे, गतिशील कारभार करू असं आश्वासित केले. तर विरोधकांच्या संख्येनुसार त्यांचे मूल्यमापन करणार नाही. त्यांच्या योग्य विषयांना सन्मान देणार असेही सांगितले. शनिवारी दि. ७ ते ९ डिसेंबर दरम्यान राज्याचे अधिवेशन आहे. यात विधानसभा अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे. याबाबत शिफारस राज्यपालांना पाठविली आहे. त्यानंतर राज्यपाल यांचे अभिभाषण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.