जळगाव ( प्रतिनिधी ) – गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाने गुरुवारी एकाच दिवसात 21 जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांच्या दृष्टीला नवी चकाकी दिली आहे.
नेत्रतज्ञ डॉ वृषाली पाटील, भूलतज्ञ डॉ. स्नेहल गिरी, आॅप्थोमॅट्रेस जयेश वाल्हे, डॉ. विजय सरताळे यांच्या टीमने या शस्त्रक्रिया पूर्ण केल्या. समन्वयाचे काम डॉ. नितीन पाटील यांनी केले. रुग्णांना दुसऱ्या दिवशी चष्मा वाटप करून घरी सोडण्यात आले.
आठवडाभरापासून देवकर रूग्णालयात ना नफा ना तोटा तत्त्वावर मोतिबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविले जात आहे. अवघ्या 2500 रुपयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व सहा हजार रुपयात फेको शस्त्रक्रिया केली जात आहे. या अभियानांतर्गतच या 21 रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या 2500 रुपयात रुग्णाच्या राहण्याची व भोजनाची मोफत व्यवस्था असून शस्त्रक्रियेपूर्वीची संपूर्ण तपासणी, मधुमेह, रक्तदाब तपासणी व रक्त चाचण्यांची तपासणी मोफत केली जात आहे. फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्यांच्यावर दर गुरुवारी सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.
देवकर रूग्णालयात पूर्व तपासणी केल्यानंतर मोतीबिंदूसाठी फेको तंत्रज्ञानाने शस्त्रक्रिया करण्याला अधिक रुग्णांची पसंती असल्याचे दिसून येत आहे.
यापुढेही डोळ्यांची समस्या असलेल्या रुग्णांनी गुरुवारपूर्वीच मोफत पूर्वतपासणी करून घ्यावी, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. रुग्णांनी डॉ. नितीन पाटील मो नं. 9422977071 व 7507724200 यावर संपर्क साधावा.