वारकरी संप्रदायातील महानुभावांचा सुर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप
पुणे (प्रतिनिधी) :- समाजातील अंधश्रद्धा नष्ट झाली तरच श्रद्धा वृद्धिंगत होऊ शकते. तेच काम महाराष्ट्र अंनिस करीत आहे. देवाधर्माच्या नावाखाली जनतेचे शोषण नको तर त्यांचे वैचारिक पोषण हवे. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा. देव तुमच्यापर्यंत येईल ही संतांची शिकवण आहे, असा सूर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३५ वर्षपूर्ती अधिवेशनात दुसऱ्या दिवशी पहिल्या परिसंवादात उमटला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विवेक जागर संस्था आयोजित ३५ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित अधिवेशनाचा रविवारी दि. २९ डिसेंबर रोजी दुसरा दिवस होता. पहिल्या परिसंवादात “ संत आणि समाज स्थिती : काल आज उद्या” या विषयावर वारकरी चळवळीतील महाराजांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी श्यामसुंदर सोन्नर महाराज होते. तर प्रमुख वक्ते म्हणून चोपदार महाराज आणि ज्ञानेश्वर बंडगर महाराज उपस्थित होते. या वेळी बंडगर महाराजांनी, संत व समाज सुधारकांचा वारसा प्रत्येक व्यक्तीने पुढे नेला पाहिजे. संतांची श्रद्धेची व्याख्या आपल्या चळवळीतून सांगून अंनिसने कृतीशील समाज प्रबोधन गेल्या ३५ वर्षांत केले, असे म्हटले.
तर चोपदार महाराज यांनी वारकरी संप्रदायाची माहिती सांगून, समाजामध्ये अफवांवर लवकर विश्वास ठेवला जातो. हे टळले पाहिजे. नेता आणि अभिनेता यातील फरक आपल्याला समजला पाहिजे. असेही ते म्हणाले. तर सोन्नर महाराज यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना अंनिसच्या कार्याचा उल्लेख करून समाजाने या चळवळीच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे सांगितले.
दिवसभरात दुसऱ्या सत्रात मुंबई येथील नंदना गजभिये, नंदुरबार येथील वसंत वळवी, नागपूर येथील कविता मते, नांदेड येथील तुळशीदास शिंदे, पनवेल येथील प्रियांका खेडकर या युवा कार्यकर्त्यांशी राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती व डॉ. माधुरी झाडे यांनी संवाद साधला. संवादातून युवकांना चळवळीतील काम करताना कसे अनुभव येतात व त्यांच्या कुटुंबीयांमधून कसा पाठिंबा मिळतो या विषयी मांडणी झाली.
तृतीय सत्रात महाराष्ट्र अंनिसच्या भविष्यातील कामकाजाविषयी पनवेल येथील आरती नाईक व शहादा येथील विनायक सावळे यांनी सहभाग घेतला. वक्त्यांनी अधिकाधिक लोक सहभाग प्रबोधनात्मक चळवळीत वाढण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असे सांगितले. अध्यक्षस्थानी राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे होते.
समारोपीय सत्रात ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे प्रमुख पाहुणे होते. अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे उपस्थित होते. समाजातील अंधश्रद्धा नाहीश्या होण्यासाठी गेल्या ३५ वर्षात प्रामाणिक व संघर्ष करून काम करणारी महाराष्ट्र अंनिस ही एकमेव संघटना आहे. अश्या शब्दात उत्तम कांबळे यांनी गौरव केला. गेल्या तीन दिवसापासून परिषद व अधिवेशन यशस्वी करण्यासाठी राज्य पदाधिकारी, ३६ जिल्ह्यातील पदाधिकारी, पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
समारोपीय सत्रात उत्तम कांबळे यांची उपस्थिती
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ३५ वर्षे पूर्ण केली याचा मला अभिमान आहे. संघटनेचा सरदार कोसळला तरी सैन्याने न थांबता अधिक जोमाने काम वाढवले, विविध प्रश्नांना हात घातला.अंनिस ही व्यवस्थेला प्रश्न विचारणारी चळवळ असून समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले. महाराष्ट्र अंनिसच्या ३५ वर्षपूर्ती निमित्ताने दोन दिवसीय राज्य अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, प्रधान सचिव संजय बनसोडे, गजेंद्र सुरकार, डॉ.ठकसेन गोराणे, नंदकिशोर तळाशिलकर यांच्यासह राज्य कार्यकारी समितीचे सदस्य उपस्थित होते.