जळगाव तालुक्यातील नांद्रा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांद्रा गावात असलेले देशी दारूचे दुकान फोडून दारूच्या बाटल्यांसह इन्व्हर्टर व बॅटरी असा एकूण ६३ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी दि. २४ जुलै रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी दि. २५ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मनीष लालचंद झंवर (वय-५३, रा. नवीपेठ, जळगाव) यांचे जळगाव तालुक्यातील नांद्रा गावात देशी दारूचे दुकान आहे. दि. २३ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी देशी दारू दुकानाचे लोखंडी ग्रीलची खिडकी तोडून दुकानात प्रवेश करत दारूच्या बाटल्या आणि इन्वर्टरसह बॅटरी असा एकूण ६३ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना दुसऱ्या दिवशी बुधवारी दि. २४ जुलै रोजी सकाळी ८ वाजता समोर आली. दरम्यान या प्रकरणी मनिष झंवर यांनी गुरुवारी दि. २५ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता जळगाव तालुका पोलिसात धाव घेऊन तक्रार केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बापू पाटील करीत आहे.