नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – देशात 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये गुन्ह्यांची नोंद होण्याच्या प्रमाणात 28 टक्क्यांनी वाढ झालेली असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालात नमूद करण्यात आले आहे.

2020 या वर्षात देशभरात 66 लाख दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. त्यातील 42.54 लाख गुन्ह्यांमध्ये भारतीय दंड संहितेची कलमे लावून नोंद झालेली आहे. उर्वरीत 23.46 लाख गुन्हे विशेष कायदे आणि स्थानिक कायद्याअंतर्गत नोंदवण्यात आलेले आहेत.
लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्ह्यांचा विचार केला तर 2020 मध्ये एक लाख लोकसंख्येमागे 487.8 गुन्हे झाले आहेत. 2019 मध्ये हे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे 385.5 इतके होते.
तमिळनाडू , गुजरात , आंध्र प्रदेश , गोवा, महाराष्ट्र , मध्य प्रदेश , तेलंगणा , उत्तराखंड , ओडिशा व पंजाब ही गुन्ह्याच्या टक्केवारीत वाढ झालेली 10 राज्ये आहेत
तमिळनाडू, गुजरातसारख्या तुलनेत शांत समजल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये गुन्ह्यांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे तर गुन्ह्यांचे जास्त प्रमाण असणाऱ्या राज्यांमध्ये टक्केवारी वाढलेली दिसत नाही यामागे काय कारण आहे? मुख्य बाब म्हणजे कोरोनामुळे सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जास्त गुन्हे दाखल झाल्याने तमिळनाडू, गुजरातसारख्या राज्यांची टक्केवारी वाढलेली दिसत आहे.
वास्तविक 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये अन्य गुन्ह्यांच्या संख्येत घट झालेली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने 2020 मध्ये लॉकडाऊन आणि त्यासंदर्भातील नियमावली जाहीर केल्यानंतर त्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 6,12,179 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या 2019 फक्त 26, 469 एवढी होती.
कोरोना नियमावलीचे उल्लंघन गेल्यांचे सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. गुजरातमध्ये 2.28 लाख तर महाराष्ट्रात 1.4 लाख गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
कोरोनामुळे कनिष्ठ न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कोरोनाच्या साथीपूर्वी 3.2 कोटी एवढी होती ती आता चार कोटींवर जाऊन पोचली आहे.







