चांगला भाव मिळाल्याने शेतकरी सुखावले
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) – संपुर्ण जिल्हाभरातील केळीला इतर राज्यात मागणी वाढल्याने केळीला भाव २७०० ते ३००० पर्यंत चांगल्या प्रकारच्या केळीला मिळत आहे. मात्र वादळामुळे व पुरामुळे केळीची आवकही कमी झाली आहे. कमी दर्जाच्या (वापसी) केळीला ६०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्यापेक्षा दर्जेदार (मध्यम) केळीला १५००, १८५०, १९०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. सर्वात चांगल्या प्रकारच्या केळीला २५०० ते ३००० रुपये प्रति क्विंटलने भाव मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे.
कश्मीर आणि पंजाबला रवाना होणाऱ्या केळीलाच हा भाव मिळत असल्याचे सांगितले जात आहे. सद्या खान्देशात केळीची आवक कमी झाली आहे. रावेर, मुक्ताईनगर, यावल, नंदुरबार, अक्कलकुवा, तळोदा तालुक्यातील मृग केळीची कापणी ९७ ते ९८ टक्के झाली आहे. म्हणुन या भागात आवक फारच कमी आहे. आवक नसल्याने व मागणी वाढल्याने केळी भावात कमालीची वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. चोपडा व जळगाव भागातील कांदे बाहार केळीची आवक असल्याने या भगातील शेतकऱ्यांची चांदी झाली आहे. यापुढे नवरात्रात अजून मागणी वाढणार असल्याचे भाकीत केले जात आहे.
सध्या मध्यप्रदेशात सुद्धा आवक कमी झाली आहे . तेथे रोज हंगामात ८० ते ९० ट्रक इतर राज्यात पाठवले जात होते. परतु ते प्रमाण २५ टक्यांनी घटले आहे. राज्यात हलक्या दर्जाची केळी निर्यात केली जातात. परंतु पंजाब, काश्मीर, उत्तर प्रदेश, दिल्ली या भागात एक नंबरचा माल निर्यात केला जातो. आवक कमी झाल्याने व्यापाऱ्यांना माल शोधणे कठीण होत आहे.