जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे विषाणूजन्य आजारांचे थैमान
तरुणाच्या मृत्यूनंतर यंत्रणा खडबडून झाली जागी
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथे डेंग्यू विषाणूचे थैमान सुरु असून येथे एका उमद्या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झालेली आहे. गुरुवारी दिवसभर आशा-अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गावात सर्वेक्षण सुरु केले असून आरोग्य यंत्रणेकडून दखल घेतली जात आहे. आणखी तीन बालके हे डेंग्यू बाधित असल्याचा अहवाल आला असून ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथील देवेंद्र विकास बारी (वय १९, रा. पाण्याच्या टाकीजवळ, शिरसोली प्र.बो. ता.जळगाव) या तरुणाचा डेंग्यू विषाणूमुळे उपचार घेत असताना खाजगी रुग्णालयात गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. यामुळे शिरसोलीत आरोग्य यंत्रणेविरुद्ध संताप व्यक्त झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय चव्हाण व म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश अग्रवाल यांनी गावात भेट दिली असून माहिती जाणून घेतली आहे. आशा अंगणवाडी यांच्या माध्यमातून गावात सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे.
दरम्यान, शिरसोली येथे आणखी तीन बालके डेंग्यू बाधित असल्याबद्दल अहवाल आहे. यात मंदार प्रणय सोनवणे (वय १४, रा. शिरसोली प्र.न.) येथिल रहिवासी आहे. बुधवारी जळगाव येथील अरुश्री हाॅस्पिटल येथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याचा डेंग्यूचा अहवाल सकारात्मक आला आहे. तर चंद्रकांत ज्ञानेश्वर पाटील (वय १६, रा. शिरसोली प्र.बो) हा बालक दोन दिवसांपूर्वी बाधित झाला. तर गुरुवारी १४ रोजी त्याची लहान बहीण वैदीका ज्ञानेश्वर पाटील (वय १४) हिचादेखील अहवाल बाधित म्हणून आला आहे. त्यांच्यावर जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
दरम्यान शिरसोली गावामध्ये दोन आरोग्य उपकेंद्र आहे. तसेच फिरता आयुर्वेदिक दवाखाना देखील आहे. मात्र त्यांच्या वेळा मर्यादित असल्यामुळे तसेच तिथे मनुष्यबळ तोकडे असल्या कारणाने तेथे ग्रामस्थांना पुरेशी आरोग्यसेवा मिळत नाही. तरुणाचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. गावामध्ये माहिती घेण्याचे काम त्यांनी सुरू केले असून पथक पाठविले आहे. गावातील आरोग्य कर्मचारी वेळेवर न येणे, वेळेच्या आत दवाखाना बंद करणे यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.