जिनेव्हा (वृत्तसंस्था ) : –जगभरातील कोरोना महामारी अत्यंत धोकादायक परिस्थितीत आहे. कोरोनाचे डेल्टासारखे व्हेरिएंट अधिक संक्रमक आहेत आणि सतत बदलत आहेत, असा इशारा जागतिक आऱोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी दिला आहे. तसेच, ज्या देशांमध्ये कमी लोकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. त्या देशातील रुग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. डेल्टासारखा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य असून बर्याच देशांमध्ये तो पसरत आहे, असे टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
अद्याप कोणताही देश धोक्याच्या बाहेर नाही. डेल्टा व्हेरिएंट धोकादायक आहे आणि काळानुसार तो बदलत आहे, ज्यावर सतत देखरेख करणे आवश्यक आहे, असे टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस म्हणाले. तसेच, डेल्टा व्हेरिएंट कमीतकमी 98 देशांमध्ये आढळून आला आहे आणि कमी आणि जास्त लसीकरण झालेल्या देशांमध्ये वेगाने पसरत आहे. कठोर पालन करणे, तपासणी, लवकर निदान, विलगीकरण आणि वैद्यकीय सेवा यासारखे सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाय अजूनही महत्त्वाचे आहेत, असे टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी सांगितले.
मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, गर्दीची ठिकाणे टाळणे आणि घरे हवेशीर ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्था करणे आवश्यक आहे, असे म्हणत पुढील वर्षापर्यंत प्रत्येक देशातील 70 टक्के लोकांचे कोरोना लसीकरण व्हावे, यासाठी डब्ल्यूएचओ महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी जगातील नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस म्हणाले, ‘कोरोना महामारी नष्ट करणे, लोकांचा जीव वाचविणे, धोकादायक व्हेरिएंटचा जन्म होण्यापासून रोखणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. या सप्टेंबरच्या अखेरपर्यंत आम्ही सर्व देशांतील नेत्यांना किमान 10 टक्के लोकांचे लसीकरण करण्यासाठी आवाहन करत आहोत.’ दरम्यान, डब्ल्यूएचओने या आठवड्यात सांगितले होते की, डेल्टा व्हेरिएंट पहिल्यांदा भारतात आढळला होता, आता सुमारे 100 देशांमध्ये आढळला आहे.