जळगाव ;- एरंडोल तालुक्यातील कढोली येथे एका लग्न समारंभात जेवण केल्याने सुमारे ७० जणांना विषबाधा झाल्याने उलटी आणि मळमळ यासारखा त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारादरम्यान रुग्णालयात दाखल केले असता यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते . यामुळे गावात खळबळ उडाली आहे .


याबाबत सुताराने दिलेली माहिती अशी कि , कढोली गावात १६ फेब्रुवारी रोजी भास्कर झावरु बडगुजर यांच्या मुलाच्या लग्नात जेवण केल्याने काही नागरिकांना १७ रोजी सकाळपासूनच उलट्या, मळमळ, जुलाब व पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. सायंकाळी तर अनेक नागरिकांना हा त्रास अधिकच जाणवू लागल्याने नागरिकांनी गावातील खाजगी डॉक्टरांकडे धाव घेतली. हा प्रकार गावातील काही नागरिकांनी जिल्हा परिषदेचे सदस्य नाना महाजन यांना कळविला. त्यांनी तात्काळ रिंगणराव प्राथमिक आरोग्य केंद्राला घटनेची माहिती दिली.
रिंगणगाव येथून सहा डॉक्टर व दहा परिचारिका यांचे पथक दाखल झाले. त्यांनी नागरिकांवर उपचार केले. यात प्रकृती खालावलेल्या ५ जणांना रूग्णवाहिकेने जळगावला आणण्यात आले आहे. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल भंगाळे यांनी दिली.







