यावल ;- आज दुपारी १ वाजेच्या सुमारास यावल-चोपडा मार्गावरील रस्त्यावर फॉरेस्ट कार्यालयाजवळ २ दुचाकी वाहनांचा अपघात होवुन यात ४ जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
सावदा तालुका रावेर येथील राहणारे संतोष किसन भोई (वय-३०) व भुसावळ येथील राहणाऱ्या आशा विनोद भोई (वय २५) हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीडी ५८६२) या वाहनाने सावदाहुन तोरखेडा तालुका शहादा येथे बहीणीकडे जाण्यास निघाले असतांना यावल-चोपडा मार्गावर शहरापासून जवळ असलेल्या वनविभागाच्या कार्यालयासमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात संतोष भोई, आशा भोई व अन्य दोघे असे चार जण जखमी झाले.







