लंडन (वृत्तसंस्था) : कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. जगातल्या १८५ पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. ३० लाख लोकांना लागण झाली आहे तर आत्तापर्यंत दोन लाख जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या इंटरनॅशनल रिस्क्यू कमिटीने मोठे भाकित केले आहे. कोरोनामुळे जगभरात तब्बल १०० कोटी लोक बाधित होतील आणि त्यामुळे ३० लाखांपेक्षा जास्त लोकांचा बळी जाईल अशी भीती कमिटीने व्यक्त केली आहे. कमिटीचे प्रमुख डेव्हिड मिलीबँड यांनी तयार केलेल्या अहवालात हा भीतीदायक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
रिस्क्यू कमिटीच्या मते औषध निघून त्याचा वापर सुरू व्हायला जास्त वेळ लागणार आहे. तोपर्यंत कोरोना आणखी पसरणार आहे. यात आफ्रिका आणि आशियातले गरीब देश सर्वाधिक भरडले जाणार आहेत. या देशांजवळ आर्थिक पाठबळ नाही आणि आरोग्यविषयक सुविधाही नाहीत. त्यामुळे जगातील ३४ देश यात पीडित ठरणार आहेत.
या यादीत भारताचा समावेश नाही. मात्र भारताच्या शेजारच्या तीन देशांचा समावेश आहे. यात पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारचा समावेश आहे. सर्वाधिक लोकसंख्या, पायाभूत सुविधांची कमतरता आणि दाट वस्ती यामुळे कुठल्याही नियमांचे पालन होऊ शकत नाही असेही कमिटीच्या अहवालात म्हटले आहे.
जगातल्या बड्या देशांनी या गरीब देशांना मदत करावी. कोरोना ही जागतिक महामारी असेल तर सर्व देशांनी मिळून याचा मुकाबला केला पाहिजे तरच त्यावर मात करता येईल अन्यथा काहीही करता येणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहे. अनेक टेस्ट केल्या जात आहेत, व्यक्तीनुसार तपासण्या होत आहेत. मात्र आता एखाद्या क्षेत्रात कोरोना व्हायरसचे संक्रमण तर झाले नाही ना हे तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी सांडपाण्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना रुग्णाच्या मलातही व्हायरस असतो. शौचानंतर हा मल मलवाहिन्यांमार्फत सीवेज ट्रिटमेंट प्लांटपर्यंत पोहोचतो आणि त्याचे परीक्षण करून त्या क्षेत्रातील संक्रमणाची माहिती मिळू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. एखाद्या क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असेल तर त्या ठिकाणाच्या सांडपाण्यात संक्रमित मलाची मात्राही जास्त असेल आणि अशा पद्धतीने भरपूर प्रमाणात संक्रमित असलेल्या क्षेत्राची माहिती मिळू शकते.