चोरट्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात वाढीव कलम लावण्याची मागणी ; राजकीय दबावामुळे आरोपी मोकाट
यावल ;- तालुक्यातील गिरडगांव ग्रामपंचायतीची कोणाचीही परवानगी न घेता लबाडीचा इराद्याने निंबाची व इतर एकूण 66 झाडे तोडून कापून चोरून नेल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस गेल्या 13 दिवसात अटक न होत असल्याने पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यावर आरोपीचे समर्थक काही लोकप्रतिनिधी राजकीय दबाव आणि प्रभाव टाकत असल्याचा संशय गिरडगाव ग्रामस्थांनी व्यक्त करून सदरच्या गुन्ह्यात आरोपीविरुद्ध वाढिव कलम लावणेबाबत लेखी तक्रार केली आहे.
पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार
तालुक्यातील गिरडगांव ग्रामपंचायत हद्दीतील 79 हजार रुपये किमतीची निंबाची व इतर एकूण 66 झाडे किनगाव येथील संशयित आरोपी सद्दाम शहा खलील शहा याने लाकडे काढण्याच्या मशिनने कुऱ्हाड, करवत, इत्यादी साहित्याच्या साह्याने कापून त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर स्वराज्य 744 कंपनीचे लाल रंगाचे नंबर नसलेले व त्यासोबतच्या ट्रॉली लाल रंगाची नंबर एम. एच. 19 ए.एन. एकोणवीस 7691 मध्ये भरून चोरून घेऊन जात असताना मिळून आल्याच्या कारणावरून यावल पोलीस स्टेशनला दिनांक 13 एप्रिल 2020 रोजी गुन्हा दाखल आहे परंतु आरोपी गेल्या 13 दिवसात अटक झालेली नाही.
आरोपीला अटक करु नये म्हणून रावेर यावल विधानसभा मतदार संघातील पूर्व-पश्चिम विभागातील काही लोकप्रतिनिधी आरोपीला वाचविण्यासाठी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यावर राजकीय दबाव आणि प्रभाव टाकत असल्याचा आरोप फिर्यादी सरपंच हिने केलेला आहे.
गिरडगांव महिला सरपंच अलका मधुकर पाटील यांनी दिनांक 25 एप्रिल 2020 शनिवार रोजी पोलीस निरीक्षक यावल यांच्याकडे लेखी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 64 / 2020 मधील गुन्ह्याचा काळ हा साथीचे रोग निवारण्याचा असल्याने त्यात साथीचे रोग नियंत्रण अधिनियम 1987 चे कलम 3 चे उल्लंघन, कलम 144 चे उल्लंघन केल्याने भादवि 188, 269, 270 व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 यांचे उल्लंघन केल्याने तसेच सदर गुन्ह्यात संशयित आरोपी सद्दाम शहा यांच्यासोबत इतर 10 ते 12 असे आरोपीत्यांचा सहभाग असल्याने दाखल गुन्ह्यात वाढीव कलम लावून आरोपीस तात्काळ अटक करावी असे नमूद केलेले असून याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे ऑनलाइन दिले असल्याचे सरपंच यांनी सांगितले.
लाकूड चोरी प्रकरणात आरोपीला अटक होते किंवा नाही ? तसेच दाखल गुन्ह्यात यावल पोलीस निरीक्षक वाढीव कलम नोंद करतात किंवा नाही याकडे तालुक्यातील संपूर्ण राजकारणाचे लक्ष वेधून आहे.