पहूर;- पहूरअंतर्गत असलेल्या पाचोरा रस्त्यावरील महेश छाजेडनगरात अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून महिलेला चाकूचा धाक दाखवून तब्बल १ लाख १६ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पहूर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पाचोरा विभागाचे डीवाएसपी भारत काकडे, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, शशिकांत पाटील व श्रीराम धुमाळ यांनी पाहणी केली.
भागवतराव गायकवाड हे महेश छाजेड नगरातील रहिवासी आहेत. बुधवारी मध्यरात्री भागवत गायकवाड यांच्या पत्नी भारतीबाई या शौचावरून घरात प्रवेश करीत असताना घराच्या मागील बाजूस दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी तोंडाला रूमाल बांधलेला असल्याने चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. भारतीबाई यांना चाकूचा धाक दाखवून दागिने व पैशाची बतावणी केली. महिला घाबरल्याने किचन ओट्याखाली ठेवलेला डबा चोरट्यांना दिला. यातील ३ ग्रॅम वजनाचे १२ हजार किमतीचे डोरले, २४ हजार किमतीचे सहा ग्रॅमचे पदक, १६ हजार रुपयांचे चार ग्रॅम वजनाचे वेल, ४० हजारांचा दहा ग्रॅम वजनाचा नेकलेस, दोन ग्रॅम वजनाचे आठ हजार किमतीच्या दोन नथ असे एक लाख सोळा हजार वजनाचे दागिने लंपास केले.







