नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- जगावर करोनाचं संकट ओढवलेलं असताना जगभरात सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. मोदी म्हणाले,”करोनासारख्या महामारीच्या संकटात जग योगाला अधिक गांभीर्यानं घेत आहे. योगामुळे आपलं मानसिक व शारीरिक आरोग्य अधिक सुदृढ बनतं. त्यामुळे प्रत्येकानं व्यायाम करण्याबरोबरच योगालाही आयुष्याचं भाग बनवावं,” असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं.

२०१५ मध्ये २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज सहावा योग दिवस साजरा होत आहे. यानिमित्तानं बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “योग दिन हा एकात्मतेचा दिवस आहे. जो आपाल्याला जोडतो. सोबत आणतो तोच तर योग आहे. करोनाच्या या संकटाच्या काळात जगभरातील लोकांनी माय लाईफ माय योग या स्पर्धेत सहभाग हे दाखवून देतो की, लोकांच्या योगाविषयी उत्साह वाढत आहे. यावर्षी योगाचं ब्रीद घरातच योग, कुटुंबासोबत योग आहे. आज सगळे कुटुंबासोबत योग करत आहे. योगाच्या माध्यमातून सगळे एकत्र येतात, तेव्हा संपूर्ण घरात ऊर्जेचा संचार होता. कौटुंबिक बंध वाढवण्याचाही हा दिवस आहे. करोनाच्या संकटामुळे जग योगाला पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्यानं घेत आहे. प्रतिकारशक्ती चांगली असेल तर करोनाला हरवण्यात मदत मिळते. योगाची अनेक आसनं आहेत. जी आपल्या शरीराची शक्ती वाढवतात,” असं मोदी म्हणाले.







