मुंबई (वृत्तसंस्था ) ;- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना वाढत असताना ऑक्सिजन आणि बेडची कमतरता या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यासोबतच लसींचा तुटवडाही जाणवत आहे. यावरून विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षला धारेवर धरलं आहे. मात्र अशातच विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने म्हणजेच तन्मय फडणवीसने कोरोनाची लस घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षावरील लोकांना लस मिळत आहे. मात्र तन्मय फडणवीस हा ४५ वर्षाचा नसतानाही त्याला लस कशी काय देण्यात आली?, असा प्रश्न करण्यात येत आहे. यावर देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
लसीकरणासाठी पात्र नसल्यामुळे माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळाली नाही. त्यामुळे प्रत्येकानं नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे.