लंडन : – कोरोनाचा संसर्ग झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. लंडनच्या सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी (12 एप्रिल) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बोरिस जॉन्सन यांनी राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या (एनएचएस) डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. “दोन आठवड्यांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर माझे प्राण वाचवल्याबद्दल मी आभार मानतो,” असं बोरिस जॉन्सन म्हणाले.
ब्रिटीश पंतप्रधानाच्या अधिकृत निवासस्थान तसंच कार्यालय 10 डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, “पंतप्रधानांना रुग्णालयातू डिस्चार्ज देण्यात आला आहे. चांगली देखभाल केल्यामुळे पंतप्रधानांनी सेंट थॉमस रुग्णालयातील प्रत्येकाचे आभार मानले आहेत.”
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 55 वर्षीय पंतप्रधान बोरिस जॉन्सन तातडीने कामावर रुजू होणार नाहीत. बोरिस जॉन्सन ठणठणीत बरे होईपर्यंत देशाचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक रॉब त्यांच्यावतीने संपूर्ण कामकाज पाहतील.