जळगाव (प्रतिनिधी ) – तुमचे बीएसएनएलचे कनेक्शन बंद करण्याचे टाळायचे असेल तर केवायसी करावी लागेल असे सांगून एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या खात्यामधून सुमारे ९ लाख ९० हजार रुपये काढून अज्ञात भामट्यानी गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर सेलला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद गेंदालाल कोचुरे (वय-६०) असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे.बीजे नगर येथे ते कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास त्यांना दोन अज्ञात क्रमांकावरुन फोन आला. यावेळी त्याने विनोद कोचुरे यांना तुमचे बीएसएनएल कनेक्शन बंद होत आहे. ते कनेक्शन चालू ठेवण्यासाठी तुम्हाला केवायसी करावी लागेल असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच त्यासाठी तुम्हाला दहा रुपयांचा रिचार्ज करणे गरजेचे आहे असे देखील त्यांनी विनोद कोचुरे यांना सांगितले.
फोन करणार्याने विनोद कोचुरे यांना त्यांच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवरुन बीएसएनएल केवायसी क्विक सपोर्ट नावाचे ऍप्स डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांनी हे ऍप डाऊनलोड करताच संबधिताचे त्यांच्या मोबाईलचा ऍक्सेस घेवून त्यांच्या एसबीआयच्या बँक खात्यातील ९ लाख ९० हजार रुपये परस्पर वर्ग करण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहे.