कोलकाता : पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘यास’ चक्रीवादळ निर्माण झाले असून त्याची तीव्रता आता वाढली आहे. येत्या २४ तासात यास हे ओडिशा-बंगालच्या किनारी धडकणार असून त्यामुळे या भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याच्या आधी या राज्यातील भागातमध्ये पाऊस सुरू झाला आहे. ओडिसा, भुवनेश्वर, चांदीपूर, आणि बंगालच्या दीघामध्ये आज पाऊस होत आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
१६५ किमी प्रति तासाने वाहणार वारे
हवामान खात्याच्या एका अंदाजानुसार, यास चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून १५५-१६५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दोन मीटर ते ४.५ मीटर उंच लाट उसळण्याची शक्यता आहे. समुद्र किनारपट्टीवर धडकण्याआधी चक्रीवादळ अधिक घातक असणार आहे. सोमवारी सकाळी ओडिशाच्या पराद्वीप आणि बंगालच्या दीघा बेटाच्या दरम्यान असलेले हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकत आहे आणि मंगळवारी या दोन राज्यांच्या किनारी धडकणार आहे.







