जळगाव – प्रतिनिधी – जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या साथीच्या फैलावाचा व या आजाराने रूग्ण दगावण्याच्या आकड्यांचा वेग लक्षात घेतला तर हा वेग राज्यात सर्वाधिक आहे. ही भयावह परिस्थिती ओढावण्यामागे सरकारी यंत्रणांची एक प्रकारची निष्क्रीयताच खरे कारण आहे का?, हे शोधावे लागेल कारण मला सचिव पातळीवरून आलेल्या अनुभवाच्या आधारावर असे वाटते आहे की , या जिल्ह्याकडे संबंधितांकडून मुद्दाम दुलर्र्क्ष केले जात असावे , असा खळबळजनक आरोप आज माजी मंत्री व जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांंनी केला आहे.
आपल्या या आरोपाच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील परिस्थितीबद्दल बोलताना आमदार गिरीश महाजन पुढे म्हणाले की, आजही जिल्ह्यातील हजारो रूग्ण त्यांच्या तपासणी अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. कारण रूग्णांच्या तपासणीची कामे अपेक्षित तत्परतेने होत नाहीत . सुरूवातीपासूनच जिल्ह्यात प्रशासन गांभीर्याने उपाययोजना करू शकलेले नाही म्हणून परिस्थिती हाताबाहेर गेली असे म्हणता येत नसले तरी आहे ते वास्तव भयानक आहे हे मात्र नक्की. सुरूवातीला या जिल्ह्यात सरकारी कोरोना तपासणी प्रयोगशाळाच नव्हती. त्यावेळी स्क्वॅब नमुने धुळे, नासिक, पुणे येथे पाठवले जात होते. त्यात वेळ खूप वाया जात होता. या जिल्ह्यासाठी सरकारी प्रयोगशाळा आता कार्यान्वित झालेली असली तरी आजही रूग्णांना आठ ते दहा दिवस त्यांच्या अहवालाची वाट पाहावी लागते. या प्रयोगशाळेत दररोज फक्त 80 ते 100 रूग्णांची तपासणी केली जाऊ शकते. या दहा दिवसांच्या काळात तो संशयित रूग्ण कित्येक लोकांच्या संपर्कात आलेला असतो. याचे भान येथील प्रशासनाला आलेलेच नाही . रूग्णसंख्यावाढीच्या महत्वाच्या कारणांपैकी हेही एक कारण आहे. त्यामुळे यापुर्वीच मी सूचना केली होती की संशयित रूग्णांच्या तपासणीचा अडीच -तीन हजार रूपये जो काय असेल तो खर्च राज्य सरकारने भरावा व खाजगी प्रयोगशाळांमधून तपासण्या करून घ्याव्या त्यामुळे संशयितांची व लागण झालेल्यांची संख्या लवकर स्पष्ट होेईल. मात्र त्याकडे कुणीच लक्ष दिले नाही लोकप्रतिनिधींना जिल्हा प्रशासन विश्वासात घेत नाही. या जिल्ह्यात पुरेशा रूग्णवाहीकाही नसल्याने रूग्णांची प्रचंड हेळसांड होते आहे. पाच पाच तास वाट पाहिल्यावर रूग्णवाहिका मिळते. त्यामुळेही रूग्णांची प्रकृती गंभीर होऊन ते दगावण्याची भिती असते हे येथील प्रशासनाच्या लक्षात कसे येत नाही?. अत्यंत अपुरे मनुष्यबळ व अर्धवट सुविधांच्या आधारावर या जिल्ह्यात काम केले जात आहे तेच लोकांच्या जिवावर बेतले आहे, असेही ते म्हणाले. .