नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- एका विमानामध्ये प्रवास करणाऱ्या पत्रकाराला अटक करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी थेट विमानाचं अपहरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. युनानहून लिथुआनियाकडे निघालेल्या प्रवासी विमानाला अचानक जबरदस्ती बेलारुसमध्ये उतरवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
पत्रकार रोमन प्रोटसेविच आणि त्यांची प्रेयसी सोफिया हे विमानात प्रवास करत असताना त्यांना अटक करण्यासाठी बेलारूस प्रशासनाने विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी दिली आणि रयान एअर कंपनीच्या विमानाला मिंक्स विमानतळावर उतरवलं. या सर्व प्रकरणामुळे युरोपियन महासंघाने बेलारुसचा निषेध व्यक्त करत त्यांच्या हवाई क्षेत्रातून विमान उड्डाण करण्यास बेलारुसला बंदी घातली आहे.
पत्रकार रोमन यांच्यावर बेलारूसमधील वातावरण अस्थिर करण्याचा आरोप करण्यात आला आहे. रोमन यांना अटक करण्यासाठी विमान अपहरण नाट्य केल्यामुळे बेलारुस आणि पाश्चिमात्य देशातील तणाव आणखी वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. युरोपियन महासंघातील तब्बल 27 देशांची विमानं बेलारूसच्या हवाई मार्गाचा वापर इथून पुढे करणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.







