हिंगोली;- सोमवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार 22 जवानांसह एका परीचारिकेला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यावर पाठोपाठ आज मंगळवारी 5 मे रोज दुपारी 12 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयाला मिळालेल्या अहवालानुसार आणखी 14 एसआरपीएफ जवानाना कोरोनाची लागण झालीआहे. जिल्ह्यातील एकुण बाधित रुग्ण संख्या 90 वर पोहचली आहे.
हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलातील जवान मालेगाव व मुंबई या हॉटस्पॉटमधुन परतल्यावर 194 जवानांच्या घशातील लाळेचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 184 जवानांचे अहवाल सुरुवातीला निगेटिव्ह आले होते. मात्र, दुसऱ्या तपासणीनंतर दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह जवानांची संख्या वाढत आहे. 4 मे रोजी रात्री 22 जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. दरम्यान, आज 5 मे रोजी दुपारी 12 वाजता हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात मिळालेल्या अहवालनुसार आणखी 14 जवान कोरोना बाधित झाले आहेत. यामध्ये मालेगावच्या बंदोबस्तातील 35 व मुंबईहुन आलेले 48 जवान कोरोनाग्रस्त झाले आहेत. या व्यतिरिक्त उपचार करणाऱ्या एका परीचेकेला प्राथमिक लक्षणे आढळून आल्या नंतर तिचे स्वब नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले होते. ज्या मध्ये ती बाधित असल्याचे आढळून आले. ही परिचारिका राहत असलेल्या हिंगोलीतील रिसालाबाजार परिसर सील करण्यात आला असून तिच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी सुरु आहे.