जुन्नर;- तालुक्यातील निमदरी येथील धोंडकर वाडीतल्या एका घरगुती लग्नसोहळ्याला उपस्थित राहिलेल्यात नवरदेवासह घरातील व नातेवाईक असे एकूण 23 पेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने धोंडकर वाडीत खळबळ उडाली आहे. लग्न सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून याच कुटुंबातील एक वृद्ध महिला कोरोनामुळे मृत झाली आहे. यामुळे तालुका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
लॉकडाऊन मध्ये लग्न सोहळ्याला फक्त 25 वऱ्हाडी मंडळींना परवानगी असताना धोंडकर वाडीच्या ऋषिकेश धोंडकर व आरती फोडसे यांचा 4 मे रोजी घरीच लग्न सोहळा आयोजित केला होता. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी 5 मे ला सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने नातेवाईक व पाहुणे यांची गर्दी झाली होती.