मुक्ताईनगर ;- मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती तथा कुऱ्हा येथील रहिवासी डी.ओ.पाटील यांच्या निर्घृण हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पाटील हे गावातील राजकारणात वारंवार हस्तक्षेप करत असल्याच्या रागातून कुऱ्हा ग्रामपंचायत सदस्य तेजराव भास्कर पाटील आणि शेतकरी असलेला विलास रामकृष्ण महाजन याने गावातील चिकन विक्रेता सय्यद शाबीर सय्यद शफी याला डी.ओ.पाटलांच्या हत्येसाठी अडीच लाखांत सुपारी दिली. त्याने इतर दोघांकडून ही हत्या घडवून आणली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना शनिवारी अटक केली. अजून दोघांचा शोध सुरू आहे.
माजी सभापती दिनकर ओंकार पाटील यांची यांची १७ जून रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजेदरम्यान गळ्यावर कोयत्याने वार करून हत्या झाली होती. शनिवारी दुपारी ४ वाजता त्याला बऱ्हाणपूर येथून ताब्यात घेण्यात आले. तसेच याप्रकरणी आणखी दोघे आरोपी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. दरम्यान, तेजराव पाटील, विलास महाजन व सय्यद शाबीर या तिघांना पोलिसांनी अटक केली.








