सिव्हिल सर्जनांकडून नोकरीवरून काढण्याचे आदेश ; जिल्हा आरोग्यधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष
जळगाव (प्रतिनिधी) नवजात बालकाला उपचारासाठी घेवून जातांना झालेल्या दिरंगाईमुळे जिल्हा शल्य चिकित्सक नागोराव चव्हाण यांनी १०८ रुग्णवाहिकेचे जिल्हा व्यवस्थापक राहुल जैन, तसेच जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिकेवरील डॉ. उमर देशमुख यांना नोटीस बजावली असून डॉ. उमर देशमुख यांना तत्काळ नोकरीवरुन काढून टाकण्याचे आदेश दिले आहे.दरम्यान डॉ. उमर देशमुख हे म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गंत वडली उपकेंद्रात सीएचओ म्हणून गेल्या सहा ते सात महिन्यापासून कार्यरत आहेत. तसेच ते जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १०८ रुग्णवाहिकेवर देखील कार्यरत असल्याने त्यांच्यावर जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, नवजात बालकाला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार रुग्णांचे नातेवाईक फिरोज शेख यांनी २ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १२ वाजता १०८ रुग्णवाहिकेला कॉल करुन नवजात बालकाला उपचारासाठी औरंगाबाद येथे घेवून जायचे असल्याचे सांगितले होते. त्यावेळी १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांनी अर्ध्यातासात रुग्णवाहिका येईल असे सांगितले होते. वास्तविक त्यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १०८ रुग्णवाहिका उपलब्ध असतांना त्या बालकाच्या नातेवाईकांना औरंगाबाद येथे बेड उपलब्ध आहे का याची खात्री करा तरच आम्ही बालकाला औरंगाबाद घेवून जाऊ असे सांगण्यात आले. त्यानंतर रात्री ८.३० वाजता बेड उपलब्ध असल्याची खात्री बालकाच्या नातेवाईकांनी दिल्यानंतर देखील दीड ते दोन तास दिरंगाई करण्यात आली. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी त्या रुग्णवाहिकेचे डॉक्टर, जिल्हा व्यवस्थापक यांच्यासह संबधित लोकांना नोटीसा बजाविल्या असून दिरंगाई करणाऱ्या संबधित डॉक्टराला काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडून कारवाईची अपेक्षा
दोन जागी सेवा वाजविणारे डॉ. उमर देशमुख हे १०८ रुग्णवाहिका आणि म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गंत वडली उपकेंद्रात सीएचओ म्हणून कार्यरत असताना दोन्ही जागेवरचे वेतन स्वीकारत होते. त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी नोकरीवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच
वडली उपकेंद्रात सीएचओ म्हणून कार्यरत डॉ. उमर देशमुख यांच्यावर आरोग्य अधिकारी डॉ. भीमा शंकर जमादार काय कारवाई करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. जर नागरिकांच्या जीवाशी खेळून हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर काय कारवाई होईल याकडे लक्ष लागले आहे.
यासंदर्भात म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत गर्ग यांनी डॉ. उमर देशमुख यांना नोटीस बजावली असून खुलासा मागविला आहे. तसेच त्यांच्या दोन्ही जागी कार्यरत असल्याच्या माहितीचा अहवाल तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठविला असून तो अहवाल जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे उद्या पाठविण्यात येणार आहे. दरम्यान डॉ. उमर देशमुख यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.