नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्या प्रकरणाला आता नवं वळण आले आहे. या प्रकरणात अटकेत असलेला ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू सुशील कुमार याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
सागर धनकर हत्या प्रकरणात दोन आठवडे फरार असलेल्या सुशील कुमारला रविवारी अटक करण्यात आली. आता दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबानीमध्ये सुशील कुमारने सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘मी निर्दोष आहे. माझी दिशाभूल करण्यात आली. मला लोकांनी लपण्याचा सल्ला दिला होता, ‘ असा दावा सुशील कुमारने केला आहे. त्याचबरोबर मी कुणाची हत्या का करु? असा प्रश्नही त्याने विचारला. त्याचबरोबर माझे कोणत्याही गँगस्टरळी संबंध नसल्याचा दावा सुशीलने केला आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुशीलच्या या दाव्यात काही तथ्य आहे का? की त्याने तपासाची दिशाभूल करण्यासाठी हा दावा केला आहे, याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत.