जळगाव तालुक्यातील नांद्रा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथे मध्यरात्रीच्या सुमारास देशी दारुचे दुकान फोडून ५३ हजार ७६० रुपयांची ७६८ देशी दारुच्या बाटल्या चोरुन नेल्याची घटना घडली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगाव तालुका पोलिसांनी तपासचक्रे फिरवित दुकान फोडणाऱ्या दहा जणांच्या टोळीला गजाआड केले.
जळगाव तालुक्यातील नांद्रा बु. येथील देशी दारुच्या दुकानात चोरी करुन तेथून ५३ हजार रुपये किंमतीच्या ७६८ देशी दारुच्या बाटल्या, इन्वर्हटरची बॅटरी असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाकडून संशयितांचा शोध घेतला जात होता. पथकाने तपासचक्रे फिरवीत संशयित महेश उर्फ चिन्या भगवान सोनवणे, सागर अरुण सोनवणे, पवन कैलास सोनवणे, अश्विन जगन्नाथ सोनवणे, अजय भास्कर सपकाळे (सर्व रा. नांद्रा बु., ता. जळगाव), अजय गणेश न्हावी, कमलाकर प्रकाश कोळी, सागर रविंद्र कोळी, निखील अनिल कोळी (सर्व रा. रिधूर ता, जळगाव), जयेश प्रल्हाद कोळी (वय ३६, रा. घार्डी, ता. जळगाव) यांना अटक केली.
पोलिसांनी अटक केलेल्या टोळीची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून २८८ देशी दारुची बाटल्या व इन्वर्हटर बॅटरी व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ बापू पाटील, किरण आगोणे, दीपक चौधरी, पोलीस नाईक गणेश पाटील, मिलींद सपकाळे, तुषार जोशी यांच्या पथकाने केली.