संचालक अरविंद भादिकर यांच्या सुचना
जळगाव (प्रतिनिधी) :- वीज ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या सेवा देण्यासाठी विजेची हानी अधिक असणाऱ्या वाहिण्यांवर प्रभावी कामगिरी करुन वीजहानी नियंत्रणात आणावी. त्यासाठी जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात महावितरण यंत्रणेने कृती आराखडा तयार करुन बारकाव्यानिशी काम करण्याच्या सूचना महावितरणचे संचालक (संचलन) अरविंद भादिकर यांनी दिल्या.
जळगाव येथील परिमंडल कार्यालयात जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील वीज समस्या, उपाय आणि विकास प्रकल्पांच्या संदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीस मुख्यालयातून संचालक (संचलन) भादिकर यांच्यासह संचालक प्रकल्प प्रसाद रेशमे, संचालक वाणिज्य योगेश गडकरी, कार्यकारी संचालक दत्तात्रेय पडळकर, धनंजय औंढेकर, सुनिल काकडे, सुनिल पावडे, भूजंग खंदारे, महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट आदीजन उपस्थित होते. त्यांचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता अनिल महाजन, निरज वैरागडे, अनिल बोरसे यांनी सन्मानपूर्वक स्वागत केले.
प्रारंभी तिन्ही संचालक व कार्यकारी संचालक यांच्या हस्ते परिमंडल कार्यालय परिसरातील मुख्य अभियंता कक्ष आणि ‘प्रकाशदीप’ या नवीन सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. संचालक संचलन भादिकर पुढे म्हणाले की, ग्राहक समाधानासाठी महावितरण कटीबध्द आहे. त्यासाठी यंत्रणेकडून प्रामाणिक वीज ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या सेवा देणे गरजेचे आहे. त्यासाठी परिमंडलात वापरण्यात आलेली वीज आणि त्याचे बिलींग यात तफ़ावत रहाता कामा नये. त्यासाठी विजेची हानी नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. विजेची चोरी किंवा गैरमार्गाने होणारा वीज वापर यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यासाठी जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून पुढील तीन महिन्यांचा कृती आराखडा तयार करावा व त्या माध्यमातून अकृषी क्षेत्रातील ग्राहकांच्या वर्गवारीवर बारकाईने काम करावे. शिवाय, विद्युत सेवेच्या कृती माणकांचेही पालन करावे. असे आवाहन त्यांनी केले.
आरडीएसएस, कुसुम (ब), प्रधानमंत्री सुर्यघर मोफ़त वीज योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, सौर कृषीपंप योजना, सौरग्राम योजना ग्राहकांच्या हिताच्या असून त्या योजना ठरवून दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्याच्या सुचना प्रकल्प संचालक प्रसाद रेशमे यांनी दिल्या. वीजनियामक आयोगाच्या सुचनांप्रमाणे महावितरणने अधिकाधिक ग्राहक स्नेही व्हावे. असेही आवाहन वाणिज्य संचालक योगेश गडकरी यांनी केले. बैठकीस जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील महावितरणचे अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते आणि सर्व अधिकारी – कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत विद्युत कामांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला.