जळगाव तालुक्यातील दापोरा येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील दापोरा गावात रात्रीच्या वेळी गच्चीवर झोपलेल्या कुटुंबातील तरुणीचा एकाने विनयभंग केला. त्याचा जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेले असता त्याने तरुणीच्या कुटुंबीयांवर जबर हल्ला केला. तर एका नातेवाईकाच्या पोटात चाकू खूपसल्याने व खांद्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोरा येथे फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरातील गच्चीवर झोपले होते. त्यावेळी अचानक त्यांच्या भाचीने आरडाओरडा केला. त्यामुळे सर्वजण जागे झाले असता, त्यांना संशयित आरोपी विनोद अरुण सोनवणे पळून जाताना दिसला. भाचीने सांगितले की, झोपेत असताना कोणीतरी तिच्या पायाला स्पर्श करत असल्याचे जाणवले. जाग आली असता विनोद सोनवणे तिच्या पायाजवळ उभा दिसल्याने ती घाबरून ओरडली.
या घटनेचा जाब विचारण्यासाठी कुटुंबीय विनोद सोनवणेच्या घरी गेले. त्यावेळी विनोदने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. कुटुंबातील इतर सदस्य घटनास्थळी पोहोचले असता, विनोदने घरातून चाकूसारखे धारदार हत्यार आणून तरुणीच्या मामाच्या पोटात खुपसून आणि उजव्या खांद्यावर वार केले. हल्ल्यात मामा गंभीर जखमी झाला असून त्याला जळगाव येथील मंगलमूर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोपी विनोद सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.