वैद्यकीय शिक्षण मंत्रालयात प्रस्ताव रवाना : डॉ. लहाने यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) – येथील कोविड रुग्णालयात वादग्रस्त प्राध्यापक चंद्रशेखर डांगे यांनी रविवारी २७ सप्टेंबर रोजी दारूच्या नशेत अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या कक्षात पुन्हा गोंधळ घातला. दरम्यान, डॉ. डांगे यांच्या सततच्या गैरप्रकारामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून वैद्यकीय शिक्षण मंत्रालयात तो पाठविण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. त्यामुळे डॉ. डांगे याच्या निलंबनाची कारवाई आता अंतिम टप्प्यात आली आहे.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात शरीरक्रिया शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. डांगे यांनी मे व जून महिन्यात दोन वेळा तत्कालीन अधिष्ठाता यांच्या वेळेला देखील कक्षात घुसून बेशिस्त वर्तन केले होते. मात्र त्याच्यावर अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी त्याच्यावर चौकशी समिती बसवली होती. त्याचा अहवाल आल्यावर डॉ. डांगे याच्यावर कारवाई व्हावी म्हणून वरिष्ठ पातळीवर डॉ. खैरे यांनी अहवाल पाठविला होता. मात्र टाळेबंदीच्या काळात मंत्रालयात कर्मचारी उपस्थितीवर बंधने आल्याने तसेच कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सांगितल्यामुळे डॉ. डांगे यांच्यावरील कारवाई प्रलंबित राहिली. त्यामुळे डॉ. डांगे मोकळा फिरत होता.
गंमतीची गोष्ट म्हणजे, तत्कालीन अधिष्ठाता डॉ. खैरे, वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्यासह ५ जणांवर भुसावळ येथील वृद्ध महिला मृत्यू प्रकरणी राज्य शासनाने जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निलंबनाची कारवाई केली. मात्र डॉ. डांगे यांची कारवाईची फाईल मात्र टाळेबंदीमुळे धूळ खात राहिली. दरम्यान, आता काही दिवसांपूर्वी डॉ. डांगे हे न सांगता रजेवर गेले. प्रशासन विभाग प्रमुख डॉ. मारुती पोटे यांनी त्याबाबतची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सांगितली. त्यांनी डॉ. डांगे यांच्यावर डॉ. खैरे यांनी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल मागितला. त्याबाबतचे कारवाई होण्याबाबतचे स्मरणपत्र डॉ. रामानंद हे वरिष्ठांना कळविले होते. याची माहिती डॉ. डांगे यांना मिळाली होती.