शल्यचिकित्सा, समाजसेवा विभागाचे अधिष्ठातांकडून कौतुक
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी दाखल वृद्ध महिलेचे पती सोबत होते. मात्र त्यांचे इतर वारस शोधण्यात रुग्णालयातील समाजसेवा विभागाला यश आले असून त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याबाबत अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी यशस्वी उपचार करणाऱ्या शल्यचिकित्सा विभागासह समाजसेवा विभागाचे कौतुक केले आहे.
शासकीय रुग्णालयात दि. २४ सप्टेंबर २०२५ पासून आंतररुग्ण सुशिला रमेश वडनेरे या वृद्ध महिला कक्ष क्रमांक ७ येथे उपचारासाठी दाखल होत्या. त्यांच्या सोबत त्यांचे पती रमेश वडनेरे हेदेखील त्यांच्या देखभालीसाठी होते. पाय घसरून पडल्याने हाडाला दुखापत झाली होती. त्यासाठी सुरुवातीला रक्ताच्या पिशव्या लागल्या. त्यानंतर महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली. या वृद्ध दांपत्यास एकच मुलगा होता. मात्र तो काही दिवसांपूर्वीच पुलावरून खाली पडून पाण्यामध्ये वाहून गेल्याने मृत्युमुखी झाला. या वृद्ध दांपत्यास स्वतःच्या मुलाचा अंत्यविधी सुद्धा करता आला नाही, अशी परिस्थिती होती. या दांपत्यास राहण्यासाठी स्वतःचे घर सुद्धा नाही. तसेच त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचाही मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
या दांपत्याच्या पुढील उदरनिर्वाह व पुनर्वसनचा प्रश्न लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत समाजसेवा अधीक्षक ऐश्वर्या त्रिभुवन यांनी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. धर्मेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाने बेघर निवारा केंद्रात या दांपत्यास दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली. त्याचबरोबर दुसर्या बाजुने रुग्णाचे नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केला. यात यांना रुग्णाचे समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांनी नातेवाईक गोकुळ मधुकर सोनार (रा. जळगाव) यांच्याशी संपर्क साधला. या दांपत्याच्या व गोकुळ सोनार यांच्या सहमतीने वृद्ध महिला रुग्णास रुग्णालयातून अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुट्टी देऊन नातेवाईक गोकुळ सोनार यांच्याकडे सोपविण्यात आले.