आकाश कंदील, लाइटिंग, रांगोळ्यांनी सजले शासकीय रुग्णालयातील वार्ड !
जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात दाखल प्रत्येक रुग्णाला घरगुती वातावरण वाटावे व त्याला उपचार घेताना मोकळेपणा वाटावा यासाठी वॉर्डांमधील डॉक्टर्स, परिचारिका, कक्षसेवक, एसएमएस कर्मचारी यांनी आकाश कंदील, लाइटिंग, रांगोळी काढून रुग्णालयातील वातावरण उल्हासित केलेले आहे.
शासकीय रुग्णालयातील कॅज्युअलटी आयसीयू कक्ष ७,८,४,६,१२,१३ यासह सर्व कक्षांच्या बाहेर रांगोळ्या काढण्यात आलेले आहेत. तसेच अनेक ठिकाणी लायटिंग लावून परिसर प्रकाशमान करण्यात आला आहे. काही वॉर्डांमध्ये आकाश कंदील लावून फुलांच्या माळा लावून परिसर सजविण्यात आला आहे.
रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना दिवाळी सणाला देखील आपण घरीच आहोत अशी अनुभूती येत आहे. येथील अधिपरीचारिका, कक्ष सेवक, एसएमएस कर्मचारी हे रुग्णांची पूर्णपणे काळजी घेत आहेत. रुग्णांवर करावे लागणाऱ्या औषध उपचारासह रुग्णांना येथे आरामदायी वाटेल असे वातावरण निर्माण करण्याचा कक्षातील सर्व घटक प्रयत्न करत आहेत. त्यामुळे गोरगरिबांना या हॉस्पिटलमध्ये आश्वासक असे चित्र आजच्या दिवाळीला दिसून येत आहे.