गावात तणाव, कारणाचा पोलिसांकडून शोध सुरू
यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील दहिगाव शिवारात एका २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाची हत्या केली असे सांगून दोन संशयित तरुण हे यावल पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर झाले आहेत. हत्येचे कारण आणि घटनेचा तपास यावल पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.
इमरान युनूस पटेल (वय २१, रा. दहिगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणात ज्ञानेश्वर पाटील आणि गजानन कोळी या दोन संशयित आरोपींनी स्वतःहून यावल पोलिसांना शरण येत गुन्ह्याची कबुली दिली आहे. इम्रान हा हनुमंतखेडे ता. धरणगाव येथील रहिवासी असून आई-वडील, मोठा भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. त्याची आजी-आजोबा दहिगाव ता.यावल येथे राहतात. वृद्ध असल्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी इमरान हा दहिगाव येथे राहत होता. शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास दहिगाव शिवारातील विरावली ते दहिगाव रस्त्यावरील एका पुलाजवळ शेताच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली.
काही कारणावरून झालेल्या वादानंतर ज्ञानेश्वर पाटील आणि गजानन कोळी या दोघांनी इमरान पटेल याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. डोक्यावर, तोंडावर आणि कमरेच्या वर वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर दोन्ही आरोपी स्वतःहून यावल पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी गुन्ह्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या घटनेची माहिती मिळताच इमरानचे वडील युनूस पटेल आणि इतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा इमरान गेल्या दोन वर्षांपासून दहिगाव येथे आजारी वडिलांची देखभाल करत होता.
मृत इमरानच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर पाटील आणि गजानन कोळी यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात यावल पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे दहिगाव परिसरात शोककळा पसरली असून, वातावरण तणावपूर्ण आहे. पोलिसांनी अधिक अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.