चाळीसगाव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील रोकडे येथे लग्नासाठी आलेल्या एकाचे साडे सहा लाखाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरीनाथ गंगाराम पाटील (वय-५१ , रा. गोंडगाव ता. भडगाव, ह.मु. उल्हासनगर जि. ठाणे) हे चाळीसगाव तालुक्यातील रोकडे येथील धनराज उत्तम पाटील यांच्या घरी लग्नानिमित्ताने १९ डिसेंबररोजी सायंकाळी ७ वाजता आले होते. लग्न आटोपून ते धरणगाव तालुक्यातील एका नातेवाईकांकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीचे साडेसहा लाखाचे २७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एका बँगमध्ये ठेवले होते. ते दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. त्यांनी शोधाशोध केली परंतु दागिने मिळून आले नाही. पंढरीनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स पो नि रमेश चव्हाण करीत आहेत .