भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील घटना
संशयित आरोपीला ताब्यात देण्यावरून तणाव
भडगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील गोंडगाव येथे गुरुवारी ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी बालिकेच्या अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी बंदोबस्तात आणले होते. त्यावेळी, संशयितास आमच्या हवाली करा म्हणून ग्रामस्थांनी पोलिसांशी गोंधळ घातला. त्यातच अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्यामुळे ३ पोलीस जखमी झाले आहेत. परिणामी पोलिसांनी लाठीचार्ज करीत गर्दी पांगवली आहे. यात पोलिसांच्या सरकारी वाहनाचेदेखील दगडफेकीत नुकसान करण्यात आले आहे. यामुळे गोंडगावात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
तालुकयातील गोंडगाव येथील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जळगाव एलसीबीने कसून तपास करीत त्याला जेरबंद केले. या संशयिताला कायदेशीर कार्यवाहीकरिता संध्याकाळी ५५ ते ६० फौजफाट्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी गावात आणले. यावेळी पोलीस आणि जमाव यांच्यात आरोपीला ताब्यात मागण्यावरून तणाव निर्माण झाला. संशयित आरोपी पोलीस वाहनातच होता. जमाव पोलिसांशी आक्रमक होऊन हुज्जत घालीत असताना अचानक कोणीतरी दगडफेक सुरु केली. यात ३ पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळाली.पोलिसांच्या सरकारी वाहनाचेदेखील दगडफेकीत नुकसान करण्यात आले आहे.
परिणामी, पोलिसांनी प्रत्युत्तरात लाठीचार्ज करीत जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. गावात यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी अतिरिक्त तुकडी मागविल्याची माहिती मिळाली असून जखमींना भडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. जखमींमध्ये चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे दिपक पाटील यांना हाताला मार लागला. तर त्याच शाखेच्या प्रकाश पाटील यांना पायाला मुक्कामार बसला आहे. पों.ना. नितिन रावते यांच्या डोक्याला मार लागला आहे. जखमींची प्रकृती स्थिर आहे.