जळगाव शहरात दादावाडी परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : घरासमोरील किराणा दुकानासमोर उभ्या असलेल्या सिमा उर्फ नम्रता संदीप पाटील (वय ४२, रा. दादावाडी) या महिलेच्या गळ्यातून दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी २ तोळ्याचे मंगळसूत्र जबरीने चोरुन गेले. ही घटना दादावाडीतील चाळीस खोल्या परिसरात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील दादावाडी परिसरातील चाळीस खोल्या परिसरात सीमा उर्फ नम्रता पाटील या महिला वास्तव्यास आहे. शुक्रवार २ रोजी सायंकाळी ७ वाजता त्या घरासमोरील किराणा दुकानासमोर रस्त्यावर उभ्या होत्या. यावेळी आनंद कॉलनीकडून दुचाकीवरुन दोन इसम त्यांच्या दिशेने आले. त्या दुचाकीवरील मागे बसलेल्या इसमाने दुचाकी किराणा दुकानाजवळ थांबवली. त्या दुचाकीवर मागे बसलेला इसम खाली उतरला आणि त्याने दुकानात असलेल्या आशाबाई भोळे यांना सिगारेट आहे का अशी विचारणा केली. त्यांनी नाही सांगितल्यानंतर तो दुचाकीस्वार दुचाकीवर बसून जात असतांना त्याने सीमा पाटील यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीचे २ तोळे वजनाचे मंगळसूत्र जबरीने ओढले आणि महामार्गाच्या दिशेने पळून गेले. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.