नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत बोलताना पाकिस्तानकडून होत असलेल्या अत्याचारांबद्दल बोलताना पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील (पीओके) कार्यकर्ता सज्जाद राजा यांना अश्रू अनावर झाले. पीओकेमधील नागरिकांसोबत जनावरांसारखी वागणूक दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पीओकेमध्ये आम्हाला आमच्या अधिकारांपासून वंचित केले जात आहे. जनावरांसारखी वागणूक देण्यापासून परिषदेने पाकिस्तानला थांबवावे, अशी विनंती सज्जाद राजा यांनी परिषदेला केली आहे.
पीओके निवडणूक अधिनियम २०२० लागू झाल्यापासून आमचे राजकीय, नागरिक आणि संविधानिक अधिकार काढून घेतले आहे. आम्हाला आमच्याच घरात देशद्रोही मानले जात आहे. तसेच पीओकेमधील नागरिकांना जनावरांसारखी वागणूक दिली जात आहे. आमची तुम्हाला विनंती आहे कि, आमच्यासोबत जे सुरु आहे ते परिषदेने थांबवावे, असेही सज्जाद राजा यांनी सांगितले.
दरम्यान, पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरममध्ये सीमेच्या दोन्ही बाजूंकडील तरुणांचे ब्रेनवॉश करण्यात येत असून भारतासोबत लढण्यासाठी त्यांना तयार केले जात आहे. पीओकेमध्ये पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.