नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतीय जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी कोरोना संकट काळात भाजपा कार्यकर्त्यांनी लोकांची सेवा केली. काहींना कोरोनाची लागण झाली तर काहींनी आपला जीवही गमावला, असे सांगत नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा कृषी विधेयकांवरून विरोधकांवर निशाणा साधला.
गेल्या काही दिवसांत आपल्या सरकारने तरुण व शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. लोकांच्या आयुष्यात सरकार जितके कमी हस्तक्षेप करेल तेवढे चांगले होईल. स्वातंत्र्यानंतर बरीच वर्षे शेतकऱ्यांच्या नावे अनेक घोषणा करण्यात आल्या. पण त्यांच्या घोषणा पोकळ राहिल्या, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
कृषी विधेयकांचा सर्वाधिक फायदा लहान शेतकर्यांना होईल.आता शेतकर्याची इच्छा आहे की, ते कोठेही धान्य विकू शकतील, जिथे शेतमालाला जास्त भाव मिळेल तेथे ते विकतील. यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना सोप्या भाषेत शेतकऱ्यांना पटवून द्यावे लागेल. जे शेतकऱ्यांसोबत खोटं बोलले, ते आता त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून चालत आहेत. हे लोक खोटं बोलून शेतकऱ्यांना फसवत आहेत, असे म्हणत नरेंद्र मोदींना विरोधकांवर हल्लाबोल केला.
याचबरोबर, काही लोकांनी राष्ट्रहिताऐवजी स्वतःचे हित सर्वोच्च ठेवले आहे. शेतकर्यांना कायद्यात अडकवून ठेवले होते. त्यामुळे त्यांचे धान्य कोठेही विक्री करता आले नाही. आम्ही MSP मध्ये रेकॉर्ड वाढविला. आतापर्यंत एक लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. यूपीए सरकारने शेतकऱ्यांना फक्त २० लाख कोटींचे कर्ज दिले होते, मात्र, आमच्या सरकारने ३५ लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज दिले, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.