२१ लाखांचा ऑनलाईन ‘गंडा’ !
आयुष्यभराची कमाई गमावली.
जळगाव (प्रतिनिधी) – समाज माध्यमांचा वापर करताना सावधगिरी बाळगणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. फेसबुकवर दिसलेल्या एका आकर्षक गुंतवणुकीच्या जाहिरातीने भुसावळ येथील एका प्रतिष्ठित वकिलाला २१ लाख ५२ हजार ३६५ रुपयांचा मोठा फटका दिला आहे. १ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
ॲड पाटील ४९ वय रा. भुसावळ हे फेसबुक पाहत असताना त्यांना शेअर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याविषयीची एक जाहिरात दिसली. उत्सुकतेपोटी त्यांनी त्या जाहिरातीवर क्लिक केले. त्यानंतर लगेचच त्यांना टेलिग्रामवर संपर्क साधण्यास सांगण्यात आले.
ॲड. पाटील यांनी लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना ‘अभय’ नावाच्या व्यक्तीचा कॉल आला. अभयने त्यांना शेअर्स ट्रेडिंगमधील गुंतवणुकीविषयी माहिती दिली आणि त्यांचे नवीन टेलिग्राम खाते उघडण्यासाठी सांगितले.या खात्यावर आलेल्या मेसेजनुसार ॲड. पाटील हे स्वताची माहिती देत गेले. यानंतर ‘नोमन’ नावाच्या एका व्यक्तीने, जो स्वतःला कंपनीचा सिनीयर मॅनेजर म्हणवत होता, त्याने संपर्क साधला. सुरुवातीला १९ हजार १६३ रुपये भरण्यास सांगितले.
फसवणूक करणाऱ्यांनी वेळोवेळी विविध कारणे सांगून ॲड. पाटील यांना पैसे जमा करण्यास भाग पाडले. त्यानुसार, ॲड. पाटील यांनी त्यांच्या बँक खात्यातून एकूण २१ लाख ५२ हजार ३६३ रुपये पाठवले. गुंतवणूक केलेले पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, अभय आणि नोमन या दोघांनीही संपर्क साधला नाही. त्यांनी जेव्हा संपर्क केला, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, ‘ती रक्कम आता ट्रेडमध्ये आहे आणि ती काढता येणार नाही.’
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, ॲड. पाटील यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे.









