जळगाव (प्रतिनिधी) : बँकेतील खातेदारांचा एटीएमकार्डसह बँकखात्याचा डाटा मिळवून त्या माध्यमातून ४१२ कोटी रुपयांच्या ऑनलाईन चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले संशयित हेमंत पाटील व बांधकाम ठेकेदार मोहसीन खान या दोघांना दोन दिवसांची २२ ऑक्टोंबरपर्यंत वाढिव पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे. यात पोलिसांनी 6 संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी नंतर अटक केलेल्या जयेश मनिलाल पटेल वय ४७ रा. चिखली, जि.नवसारी गुजरात, दिपक चंद्रसिंग राजपूत वय ३६ रा. पंचवटी, नाशिक, भारत अशोक खेडकर वय ४७ व रविंद्र मनोहर भडांगे दोन्ही रा. जेलरोड, नाशिक या चार जणांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपणार आहे. या गुन्ह्यात आणखी तीन संशयित फरार असून त्यातील एक राजस्थान, एक सुरत तर तिसरा नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील आहे. या तिघांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत.