जळगाव सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील मोरगाव खुर्द येथील केळी व्यापारी व त्याच्या मित्राची क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून अधिकचा नफा मिळवून देण्याच्या आमिषापोटी ऑनलाईन १२ लाख ८५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. अज्ञात दोघांवर सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल भिका पाटील (वय २५, रा. मोरगाव खुर्द, ता. रावेर) हा केळी व्यापारी आहे. त्याला व त्याचा मित्र गोविंद प्रभाकर पितृभक्त यांना २७ मे ते २७ जुलै दरम्यान त्यांचे व्हाट्स अप व टेलिग्राम खात्यावर सुजाता, शिवानी, स्वाती पिरामल यांनी वारंवार संपर्क साधला. दोघांचाही संशयितांनी विश्वास संपादन केला. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देतो असे संशयित्यांनी दोघा मित्रांना आमिष दाखविले. त्यानुसार वेळोवेळी अमोल पाटील यांचेकडून ७ लाख १४ हजार रुपये संशयितांनी घेतले. तसेच गोविंद पितृभक्त यांचेकडून संशयितांनी ५ लाख ७१ हजार रुपये स्वीकारले.
संशयित आरोपींनी दोघेही मित्रांची कुठलीही रक्कम परत केली नाही. तसेच, दुप्पटही दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमोल पाटील याने सायबर पोलीस स्टेशनला गुरुवारी २७ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास तक्रार दाखल केली आहे. तपास पोनि बी.डी. जगताप करीत आहेत.